Gurucharitra Adhyay 18

gurucharitra adhyay 18 pdf ( Marathi ) free download here. full content read online here. या अध्यायात श्रीगुरु नृसिंह सरस्वती यांनी एका दरिद्री ब्राह्मणाचे (गरीब ब्राह्मणाचे) दारिद्र्य कसे दूर केले, याचे सुंदर वर्णन आहे.

हा ब्राह्मण अत्यंत गरीब असल्यामुळे त्याचे जीवन खूप कष्टात होते.

श्रीगुरूंनी त्याला आपल्या कृपेने दारिद्र्यातून मुक्त केले आणि त्याला धन-संपत्ती प्राप्त झाली, ज्यामुळे त्याचे जीवन सुखी झाले.

या कथेत गुरु-शिष्य संवाद सुरू राहतो, ज्यात शिष्य (नामधारक) अधिक कथा ऐकण्याची इच्छा व्यक्त करतो आणि सिद्ध मुनी त्याला कथा सांगतात.

महत्व आणि फलश्रुती:

या अध्यायाच्या शेवटी, ज्याचे दैव उणे (कमजोर) असेल, त्याने श्रीगुरूंना शरण जावे आणि त्यांची भक्ती करावी, कारण गुरुकृपेने इह-परलोकी सौख्य प्राप्त होते, असे सांगितले आहे.

हा अध्याय दारिद्र्य नष्ट करण्यासाठी आणि धन-लक्ष्मीची प्राप्ती होण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो.

याचे नित्य पठण केल्याने आर्थिक परिस्थिती सुधारण्यास आणि कर्जमुक्ती होण्यास मदत होते, अशी भक्तांची श्रद्धा आहे.

श्री गुरुचरित्र – अध्याय अठरावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

जय जया सिद्धमुनि । तू तारक भवार्णी ।

सुधारस आमुचे श्रवणी । पूर्ण केला दातारा ॥१॥

गुरुचरित्र कामधेनु । ऐकता न-धाये माझे मन ।

कांक्षीत होते अंतःकरण । कथामृत ऐकावया ॥२॥

ध्यान लागले श्रीगुरुचरणी । तृप्ति नव्हे अंतःकरणी ।

कथामृत संजीवनी । आणिक निरोपावे दातारा ॥३॥

येणेपरी सिद्धासी । विनवी शिष्य भक्तीसी ।

माथा लावूनि चरणांसी । कृपा भाकी तये वेळी ॥४॥

शिष्यवचन ऐकोनि । संतोषला सिद्धमुनि ।

सांगतसे विस्तारोनि । ऐका श्रोते एकचित्ते ॥५॥

ऐक शिष्या शिकामणी । धन्य धन्य तुझी वाणी ।

तुझी भक्ति श्रीगुरुचरणी । तल्लीन झाली परियेसा ॥६॥

तुजकरिता आम्हांसी । चेतन जाहले परियेसीं ।

गुरुचरित्र आद्यंतेसी । स्मरण जाहले अवधारी ॥७॥

भिल्लवडी स्थानमहिमा । निरोपिला अनुपमा ।

पुढील चरित्र उत्तमा । सांगेन ऐका एकचित्तें ॥८॥

क्वचित्काळ तये स्थानी । श्रीगुरु होते गौप्येनि ।

प्रकट जहाले म्हणोनि । पुढे निघाले परियेसा ॥९॥

वरुणासंगम असे ख्यात । दक्षिणवाराणसी म्हणत ।

श्रीगुरु आले अवलोकित । भक्तानुग्रह करावया ॥१०॥

पुढें कृष्णातटाकांत । श्रीगुरू तीर्थे पावन करीत ।

पंचगंगगासंगम ख्यात । तेथें राहिले द्वादशाब्दे ॥११॥

अनुपम्य तीर्थ मनोहर । जैसें अविमुक्त काशीपुर ।

प्रयागसमान तीर्थ थोर । म्हणोनि राहिले परियेसा ॥१२॥

कुरवपुर ग्राम गहन । कुरूक्षेत्र तोंचि जाण ।

पंचगंगासंगम कृष्णा । अत्योत्त्म परियेसा ॥१३॥

कुरुक्षेत्रीं जितके पुण्य । तयाहूनि अधिक असे जाण ।

तीर्थे अस्ती अगण्य़ । म्हणोनि राहिले श्रीगुरू ॥१४॥

पंचगंगानदीतीर । प्रख्यात असे पुराणांतर ।

पांच नामे आहेति थोर । सांगेन ऐका एकचित्तें ॥१५॥

शिवा भद्रा भोगावती । कुंभीनदी सरस्वती ।

‘ पंचगंगा’ ऐसी ख्याति । महापातक संहारी ॥१६॥

ऐसी प्रख्यात पंचगंगा । आली कृष्णेचिया संगा ।

प्रयागाहूनि असे चांगा । संगमस्थान मनोहर ॥१७॥

अमरापुर म्हणिजे ग्राम । स्थान असे अनुपम्य ।

जैसा प्रयागसंगम । तैसे स्थान मनोहर ॥१८॥

वृक्ष असे औदुंबर । प्रत्यक्ष जाणा कल्पतरु ।

देव असे अमरेश्वर । तया संगमा षटकूळी ॥१९॥

जैसी वाराणसी पुरी । गंगाभागीरथी-तीरी ।

पंचनदींसंगम थोरी । तत्समान परियेसा ॥२०॥

अमरेश्वरसंनिधानी । आहेति चौसष्ट योगिनी ।

शक्तितीर्थ निर्गुणी । प्रख्यात असे परियेसा ॥२१॥

अमरेश्वरलिंग बरवे । त्यासी वंदुनि स्वभावे ।

पुजितां नर अमर होय । विश्वनाथ तोचि जाणा ॥२२॥

प्रयागी करितां माघस्नान । जें पुण्य होय साधन ।

शतगुण होय तयाहून । एक स्नाने परियेसा ॥२३॥

सहज नदीसंगमांत । प्रयागसमान असे ख्यात ।

अमरेश्वर परब्रह्म वस्तु । तया स्थानी वास असे ॥२४॥

याकारणें तिये स्थानी । कोटितीर्थे असती निर्गुणी ।

वाहे गंगो दक्षिणी । वेणीसहित निरंतर ॥२५॥

अमित तीर्थे तया स्थानी । सांगता विस्तार पुराणीं ।

अष्टतीर्थ ख्याति जीण । तया कृष्णातटाकांत ॥२६॥

उत्तर दिशी असे देखा वहे कृष्णा पश्चिममुखा ।

‘शुक्लतीर्थ’ नाम ऐका । ब्रहम्हत्यापाप दूर ॥२७॥

औदुंबर सन्मुखेसी । तीनी तीर्थे परियेसी ।

एकानंतर एक धनुषी । तीर्थे असती मनोहर ॥२८॥

‘पापविनाशी’ ‘काम्यतीर्थ’ । तिसरें सिध्द ‘ वरदतीर्थ ।

अमरेश्वरसंनिधार्थ । अनुपम्य असे भूमंडळी ॥२९॥

पुढें संगम-षट्‍कुळांत । प्रयागतीर्थ असे ख्यात ।

‘ शाक्तितीर्थ’ अमरतीर्थ’ । कोटितीर्थ’ परियेसा ॥३०॥

तीर्थे असती अपरांपर । सांगता असे विस्तार ।

याकारणें श्रीपादगुरु । राहिले तेथें द्वादशाब्दें ॥३१॥

कृष्णा वेणी नदी दोनी । पंचगंगा मिळोनी ।

सप्तनदीसंगम सगुणी । काय सांगू महिमा त्याची ॥३२॥

ब्रह्महत्यादि महापातकें । जळोनि जातीं स्नानें एकें ।

ऐसें सिध्द्स्थान निकें । सकळाभीष्ट होय तेथें ॥३३॥

काय सांगूं त्यांची महिमा । आणिक द्यावया नाहीं उपमा ।

दर्शनमातें होती काम्या । स्नानफळ काय वर्णू ॥३४॥

साक्षात् कल्पतरु । असे वृक्ष औदुबरु ।

गौप्य होऊन अगोचरु । राहिले श्रीगुरु तया स्थानी ॥३५॥

भक्तजनतारणार्थ । होणार असे ख्यात ।

राहिले तेथें श्रीगुरुनाथ । म्हणोनि प्रकट जाहले जाणा ॥३६॥

असता पुढें वर्तमानीं । भिक्षा करावया प्रतिदिनीं ।

अमरापुर ग्रामी । जाती श्रीगुरु परियेसा ॥३७॥

तया ग्रामी द्विज एक । असे वेदभ्यासक ।

त्याची भार्या पतिसेवक । पतिव्रतशिरोमणी ॥३८॥

सुक्षीण असे तो ब्राह्मण । शुक्लभिक्षा करी आपण ।

कर्ममार्गी आचरण । असे सात्विक वृत्तीनें ॥३९॥

तया विप्रमंदिरांत । असे वेल उन्नत ।

शेंगा निघती नित्य बहुत । त्याणे उदरपूर्ति करी ॥४०॥

एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी । वरो न मिळे परियेसीं ।

तया शेंगांते रांधोनि हर्षी । दिवस क्रमी येणेंपरी ॥४१॥

ऐसा तो ब्राह्मण दरिद्री । याचकारणें उदर भरी ।

पंचमहायज्ञ कुसरी । अतिथि पूजी भक्तीनें ॥४२॥

वर्तता श्रीगुरु एके दिवसीं । तया विप्रमंदिरासी ।

गेले आपण भिक्षेसी । नेलें विप्रे भक्तिनें ॥४३॥

भक्तिपूर्वक श्रीगुरूसी । पूजा करी तो षोडशी ।

घेवडे-शेंगा बहुवसी । केली होती पत्र-शाका ॥४४॥

भिक्षा करून ब्राह्मणासी । आश्वासिती गुरु संतोषी ।

गेलें तुझे दरिद्र दोषी । म्हणोनी निघती तये वेळी ॥४५॥

तया विप्राचे गृहांत । जो का होता वेल उन्नत ।

घेवडा नाम विख्यात । आंगण सर्व वेष्टिलें असे ॥४६॥

तया वेलाचें झाडमूळ श्रीगुरुमूर्ति छेदिती तात्काळ ।

टाकोनि देती परिबळें । गेले आपण संगमासी ॥४७॥

विप्रवनिता तये वेळी । दु:ख करिती पुत्र सकळी ।

म्हणती पहा हो दैव बळी । कैसें अदृष्ट आपुलें ॥४८॥

आम्हीं तया यतीश्वरासी । काय उपद्रव केला त्यासी ।

आमुचा ग्रास छेदुनी कैसी । टाकोनि दिल्हा भूमीवरी ॥४९॥

ऐसेपरी ते नारी । दु:ख करी नानापरी ।

पुरुष तिचा कोप करी । म्हणे प्रारब्ध प्रमाण ॥५०॥

म्हणे स्त्रियेसी तये वेळी । जें जें होणार जया काळी ।

निर्माण करी चंद्रमोळी । तया आधीन । विश्व जाण ॥५१॥

विश्वव्यापक नारायण । उत्पत्तिस्थितिलया कारण ।

पिपीलिकादि स्थूळ-जीवन । समस्तां आहार पुरवीतसे ॥५२॥

‘आयुरन्नं प्रयच्छति’ । ऐसें बोले वेदश्रुति ।

पंचानन आहार हस्ती । केवी करी प्रत्यही ॥५३॥

चौर्‍यायशी लक्ष जीवराशी । स्थूल सूक्ष्म समस्तांसी ।

निर्माण केलें आहारासी । मग उत्पत्ति तदनंतरें ॥५४॥

रंकरायासी एक दृष्टी । करुनि निक्षेपण ।सकृत अथवा दुष्कृत्य जाण ।

आपुलें आपणचि भोगणें । पुढील्यावरी काय बोल ॥५६॥

आपुलें दैव असतां उणें । पुढिल्या बोलती मूर्खपणे ।

जे पेरिलें तोंचि भक्षणें । कवणावरी बोल सांगे ॥५७॥

बोल ठेविसी यतीश्वरासी । आपलें आर्जव न विचारिसी ।

ग्रास हरितला म्हणसी । अविद्यासागरी बुडोनि ॥५८॥

तो तारक आम्हांसी ।म्हणोनि आला भिक्षेसी ।

नेलें आमुचे दरिद्रदोषी । तोचि तारील आमुतें ॥५९॥

येणेंपरी स्त्रियेसी । संभाषी विप्र परियेसी ।

काढोनि वेलशाखेसी । टाकीता झाला गंगेत ॥६०॥

तया वेलाचें मूळ थोरी । जे कां होतें आपुले द्वारी ।

काढूं म्हणुनि द्विजवरी । खणिता झाला तया वेळीं ॥६१॥

काढितां वेलमूळासी । लाधला कुंभे निधानेसी ।

आनंद जाहला बहुवसी । घेऊनि गेला घरांत ॥६२॥

म्हणती नवल काय वर्तले । यतीश्वर आम्हां प्रसन्न्न झाले ।

म्हणोनि ह्या वेला छेदिलें । निधान लाधलें आम्हांसी ॥६३॥

नर नव्हे तो योगीश्वर होईल ईश्वरीअवतार ।

आम्हां भेटला दैन्यहर । म्हणती चला दर्शनासी ॥६४॥

जाऊनि संगमा श्रीगुरुसी । पूजा करिती बहुवसी ।

वृत्तांत सांगती तयासी । तये वेळी परियेसा ॥६५॥

श्रीगुरु म्हणती तयासी । तुम्ही न सांगणें कवणासी ।

प्रकट करितां आम्हांसी । नसेल लक्ष्मी तुमचे घरी ॥६६॥

ऐसेपरी तया द्विजासी । सांगे श्रीगुरु परियेसी ।

अखंड लक्ष्मी तुमचे वंशी । पुत्रपौत्री नांदाल ॥६७॥

ऐसा वर लधोन । गेली वनिता तो ब्राह्मण ।

श्रीगुरुकृपा ऐसी जाण । दर्शनमात्रे दैन्य हरे ॥६८॥

ज्यासी होय श्रीगुरुकृपा । त्यासी कैचें दैन्य पाप ।

कल्पवृक्ष-आश्रय करितां बापा । दैन्य कैंचे तया घरी ॥६९॥

दैव उणा असेल जो नरु । त्याणें आश्रयावा श्रीगुरु ।

तोचि उतरेल पैलपारु । पूज्य होय सकळिकांई ॥७०॥

जो कोण भजेल श्रीगुरु । त्यासी लाधेल इह-परु ।

अखंड लक्ष्मी त्याचे घरी । अष्टैश्वर्ये नांदती ॥७१॥

सिध्द म्हणे नामधारकासी । श्रीगुरुमहिमा असे ऐसी ।

भजावे तुम्हीं मनोमानसीं । कामधेनु तुझ्या घरीं ॥७२॥

गंगाधराचा कुमर । सांगे श्रीगुरुचरित्रविस्तार ।

पुढील कथामृतसार । ऐका श्रोते एकचित्तें ॥७३॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिध्द-नामधारकसंवादे अमरापुरमहिमानं-द्विजदैन्यहरणं नाम अष्टादशोऽध्याय: ॥ १८ ॥

॥ श्रीपादश्रीवल्लभ-नृसिंहसरस्वती-दत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेव दत्त ॥ शुभं भवतु ॥

॥ ओवी संख्या ७३ ॥

Gurucharitra Adhyay 18 pdf

PDF File Information :



  • PDF Name:   गुरुचरित्र – अध्याय अठरावा
    Author :   PDFSeva
    File Size :   1 MB
    PDF View :   0 Total
    Downloads :   📥 Free Downloads
     Details :  Free PDF for Best High Quality गुरुचरित्र – अध्याय अठरावा to Personalize Your Phone.
     File Info:  This Page  PDF Free Download, View, Read Online And Download / Print This File File At PDFSeva.Net